सपत्नीक स्वर्गारोहण
सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेले करंजखोप हे कोरेगा़ंव तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे गांव आहे. ते छोटे असले तरी या गांवची जमीन अतिशय सुपिक आहे. त्यामुळे इथे बटाटा आणि आल्याचे पिक घेतले जाते. या गांवच्या कृष्णाजी दिक्षीत (सोनार) यांच्या घरात हणमंत जन्माला आला. पुर्वीच्या काळी मुलांना देवदेवतांची नांवं ठेवण्याची पद्धत होती. नांव हणमंत असले तरी बालपणा पासून सडसडीत आणि काटक अशी त्यांची शरीरयष्टी होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण गांवातील प्राथमिक शाळेत झाले. तर पुढील मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण जवळच्या वाघोली येथील रयतच्या हायस्कूलमध्ये झाले. तिथे ते उत्कृष्ट मल्लखांब खेळायला शिकले. त्यांचे वडील कृष्णाजी हे अत्यंत कसबी सोनार असल्याने करंजखोप गांवाच्या पंचक्रोशीतील लोक दागिने बनवायला त्यांच्याकडे येत असत. कृष्णाजींना हणमंत, शिवाजी आणि मुलगी अनुसया हि तीन अपत्ये झाली. वडिलांच्या हाताखाली हणमंतराव सोनारकाम शिकले, तर त्यांचा भाऊ शिवाजीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वाहन तंत्रज्ञ कोर्स केला. त्याला राज्य परिवहन महामंडळात नोकरी लागली, तो पुण्याला निघून गेला. त्यामुळे नोकरीचा प्रयत्न न करता हणमंतरावांना गांवी राहून सोनारकाम आणि शेती करणे क्रमप्राप्त होते.
मग त्यांच्या आयुष्यात पत्नी म्हणून आली आंदोरी गांवची शकुंतला. या उभयतांनी अतिशय कष्टाने संसार फुलविला. त्यांना प्रभावती, पुष्पा, सुर्यकांत आणि स्वाती ही चार अपत्ये आहेत. सगळ्यांची लग्नं झाली असून सगळ्यात मोठी प्रभावती फलटणला असते. पुष्पा आणि स्वाती या दोंघी सांगली जिल्ह्या तील तासगांवच्या पोतदारांच्या घरात सख्ख्या जावा झाल्या आहेत. तिघी मुली अत्यंत सधन आणि सुसंस्कृत घरात दिल्या असून त्या आनंदात आहेत. मुलं हणमंतरावांना अण्णा म्हणतात, त्यांचा एकुलता एक मुलगा सुर्यकांत हा सुद्धा सुशिक्षित असून तो चांगले सोनारकाम करतो. त्याची पत्नी पदवीधर असून ती लोणंद येथे नोकरी करते. अण्णांनी ईश्वरकृपेने नातवंडं तर बघितलेच परंतु तासगांवच्या पुष्पाचा नातू आरव याच्या रूपाने परतवंड सुद्धा पाहिले. माणूस कितीही जगला तरी त्याच्या जवळच्यांना तो हवाच असतो, मात्र तो हिंडता फिरता असला पाहिजे. अगदी तसेच होते हे जोडपे काटक, सोशिक आणि आहे त्यात समाधान मानणारे, खोटा बडेजाव न करणारे. त्यामुळे ते कधी दु:खी कष्टी किंवा थकून भागून बसलेले कोणी कधी पाहिले नाही. दोघांनीही कधी दुसऱ्याकडून सेवा करून घेतली नाही.
अण्णांची पत्नी मात्र गेल्या दोन तीन वर्षात आजारीच असायची. तिघी मुलींपैकी कोणी ना कोणी तिची सेवा करायसाठी जात होत्या. शेवटच्या क्षणी त्यांची धाकटी आणि लाडकी मुलगी स्वाती उर्फ बाळी त्या दोघांसोबत होती. अण्णांचे वय वर्षे ९६ असून ते रोज शेतात जायचे. त्यादिवशी ते घरा जवळच्या शेतात लसणाचे तरु लावायला गेले होते, तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. बाळीने त्यांना तात्काळ दवाखान्यात नेले तिथेच अण्णांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी संध्याकाळ झाली होती म्हणून अंत्यविधी सकाळी करायचे ठरले. सगळेजण रिकाम्या हाताने घरी आले परंतु अण्णांच्या जाण्याची बातमी आईला कशी सांगायची ? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र नियतीने तो प्रश्न विचित्र पद्धतीने सोडविला. पहाटे आईचेही दुःखद निधन झाले. निधन हे दुःखदायी असले तरी या दोघांचे वैकुंठ गमन एकमेकांच्या सोबत झाले, ही बाब समाधानकारक आणि अभूतपूर्व आहे. पत्नीला आपण सह चारिणी म्हणतो, सहचारिणीचा अर्थ पतीप्रमाणे आचरण करणारी असा होतो. तो अर्थ शब्दशः न घेता आपल्या प्रत्येक कृतिमध्ये आपण एकमेकांसोबत आहोत असं समजून वागणे. मात्र मरण ही अंतिम कृतिसुध्दा एकमेकांसोबत घडणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. त्यासाठी खुप मोठा पुण्यसंचय लागतो. असं आपल्या पुराणांमध्ये सांगून ठेवले आहे. पतिपत्नी एका चितेतून स्वर्गाच्या दिशेने मार्गस्थ होणे हा एक मोठा उत्सव घडला. पुर्वी बायका पतीबरोबर सती जायच्या त्याकाळी एका चितेत दोघांना दहन केले जायचे. मात्र गेल्या दिडशे वर्षात असा योग कोटींमध्ये एखाद्याच जोडप्याला लाभला असेल. ज्यांनी ती पतीपत्नीची एकत्र चिता पाहिली असेल ते धन्य झाले. मरणाचा सुद्धा उत्सव व्हावा याच्यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही. अण्णा हे तासगांव येथील राजेंद्र पोतदार व दयानंद पोतदार यांचे सासरे आहेत. असो, परमेश्वराच्या ईच्छेपुढे ईलाज नाही.
लेखन -
मिलींद सुतार
तासगांव जि. सांगली
भ्र. भा. 9405285609
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰