yuva MAharashtra 'क्रांती'च्या सहदेव पाटील यांनी प्रतिकूल हवामानात घेतले एकरी १४४ मे. टन ऊस उत्पादन

'क्रांती'च्या सहदेव पाटील यांनी प्रतिकूल हवामानात घेतले एकरी १४४ मे. टन ऊस उत्पादन




कुंडल (ता. पलूस) दि. १६/१२/२०२४ - 

 क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे ढवळी (ता.तासगाव) येथील ऊस उत्पादक सहदेव यशवंत पाटील यांनी एकरी १४४.५९४ मे. टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती व यावर्षी अतिवृष्टी अशी प्रतिकूल हवामान परिस्थिती असतानाही केवळ तंत्रज्ञानाचा वापर व जिद्द या जोरावर त्यांनी हे उत्पादन मिळविले आहे. याबद्दल क्रांतीचे चेअरमन, शरद लाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. श्री. पाटील यांचेकडे स्वतःची १५ एकर व खंडाने केलेली १० एकर अशी २५ एकर एकूण जमीन आहे. त्यांचे दरवर्षी सुमारे ८-९ एकर ऊसपीक असते. याचे एकरी सरासरी उत्पादन ९० मे. टनापेक्षा जास्त मिळते. गतवर्षी १ एकर क्षेत्रामध्ये हरभरा पिकाचे फेरपालट पिक घेऊन, आडसाली हंगामात २९ जून रोजी को-८६०३२ या जातीची ऊस लावण केली. लावणीपुर्वी नांगरट व रोटर मारून शेतात मेंढीचा कळप बसवला. त्यानंतर एकरी २ ट्रेलर शेणखत विस्कटून पुन्हा नांगरट, रोटर मारून ४.५ फुटावर सरी तयार केली. ऊस लागणीसाठी संशोधन केंद्र, पाडेगांव येथील बेण्यापासून तयार केलेले प्रमाणित बेण्याचा वापर केला. लावणीपुर्वी क्लोरो, बाविस्टीन व जर्मिनेटर या औषधांची बेणेप्रक्रीया करून लावण केली. लावणीवेळी सिंगल सुपर फॉस्फेट ३, डि.ए.पी.- १, १०:२६:२६ - १, अमोनियम सल्फेट १, निंबोळी पेंड २ पोती, गंधक १० किलो व सिलिकॉन ९ किलो, असा बेसल डोस दिला. दोन महिन्यांनी बाळभरणीवेळी युरिया १, अमोनियम सल्फेट १, १०:२६:२६- १, डि.ए.पी.- १ पोती, करंज पेंड २०० किलो, असा डोस दिला. तीन महिन्याने मध्यम भरणीवेळी युरिया २, अमोनियम सल्फेट २, डि.ए.पी.- २, ९:२४:२४ - २, २४:२४:० - २, मिश्र पेंड २, करंज पेंड ३०० किलो, शेंग पेंड ५०० किलो, पोटॅश २ पोती, १५ मे. टन प्रेसमड, ४ मे. टन कोंबडी खत व ६ ट्रेलर शेणखत हे सर्व खत मिसळून वापर केला. मोठ्या भरणीवेळी पुन्हा युरिया १, अमोनियम सल्फेट १, २४:२४:० -१, पोटॅश १, डि.ए.पी.- १ व सिलिकॉन या खताचा वापर केला. लागण केलेनंतर १५ दिवसाच्या अंतराने विद्राव्य खते, संजिवके, ह्युमिक अॅसिड, फुलविक अॅसिड च्या ५ वेळा आळवणी व ८ वेळा फवारणी केल्या आहेत. मोठ्या भरणीनंतर, खताच्या दोन अतिरिक्त मात्रा त्यांनी वापरल्या आहेत. ऊसपिक १० महिन्याचे झाल्यावर वाळलेले पाचट काढून, सरीत आच्छादन केले. ऊसाची तोड ०१ ते ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत झाली, तेव्हा या ऊसाला सरासरी ४९-५० कांड्या होत्या. श्री. पाटील यांचेकडे गायी म्हैशी मिळून सुमारे २० पशुधन आहे. या पशुधनाच्या सर्व मुत्राचा वापर त्यांनी या ऊस शेतीमध्ये केला.


 गाळपावेळी त्यांचे शेतात सरासरी ४९ हजार ऊससंख्या व सरासरी ३ किलो प्रति वजनाचा ऊस मिळाल्यामुळे ते या विक्रमी उत्पादनापर्यंत पोहचू शकले. या विक्रमी उत्पादनापर्यंत पोहचणेसाठी त्यांचा स्वतःचा ऊस शेतीतील अनुभव व क्रांती कारखान्याचे वसगडे विभागाचे अधिकारी अजय पाटील, वैभव नवले आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰