तासगांव दि १४ : येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या सांगली शिक्षण संस्थेच्या शिक्षण संकुलाच्या आवारातील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदीर, रे. रा. काळे बालक मंदिर, श्रीमंत विनायक उर्फ बाबासाहेब पटवर्धन कन्या प्रशाला, राधा गोविंद मराठे बालशाळा, शांताबाई शंकर खुजट बालविहार या सर्व शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन एकाच व्यासपीठावर मागील आठवडाभर सुरु होते. त्याचा सांगता समारंभ शनिवारी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती आणि रांगोळी प्रदर्शनाचे अवलोकन मान्यवरांनी केले. नंतर व्यासपीठा वरील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यादेवी सरस्वती आणि संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन झाले. चं. वा. ज्ञानमंदिराचे मुख्याध्यापक मा. मुकुंद जोग यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक मा. ऐतवडेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. अध्यक्षस्थानी असलेल्या मा. रवींद्र देवधर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाच्या नागरी हक्क सेवा विभागाचे सहसचिव मा. माणिक दिवे, प्रसिद्ध उद्योगपती मा. सचिन बोथरा तसेच प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मा. मिलींद सुतार या तिघांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे माणिक दिवे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि या शाळेत माझे माध्यमिक शिक्षण झाले याचा मला अभिमान आहे. या शाळेत शिकत असताना तत्कालीन शिक्षकांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे आणि करून घेतलेल्या अभ्यासामुळे मी जीवनात यश संपादन करू शकलो. आज मी प्रशासकीय सेवेत असलो तरी शाळेने दिलेले संस्कार कधीच विसरत नाही. त्यानंतर मा. सचिन बोथरा म्हणाले कि शाळेत असताना नेहमी वाटायचे कि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला कधी तरी व्यासपीठावर बसण्याची संधी मिळावी. ते स्वप्न शाळेने दिलेल्या संस्कारांमुळे आज पूर्ण झाले. माझ्या यशामध्ये माझ्या शाळेच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, हे मी विनम्रपणे मान्य करतो. मा. मिलींद सुतार म्हणाले कि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी जगभरात पसरलेले आहेत. त्यांना वाँटस् अँपच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा एक प्रयत्न सुरू आहे त्याचा मी एक महत्वाचा घटक आहे याचा मला अभिमान आहे. समोरच्या विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले कि भविष्यात तुमच्यापैकी प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे यश मिळविल्यास मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण तेच आपल्या शाळेचे प्रमुख वैशिष्ठ आहे.
त्यानंतर बौद्धिक, क्रीडा, विज्ञान, कला वगैरे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मा. मुजावर सर, मा. मिरजकर मॅडम, मा. नितीन जोशी यांनी आपापल्या विभागांची पारितोषिके जाहीर केली. मा. स्वामी सरांनी सूत्रसंचालन केले. मा. गायकवाड मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰