yuva MAharashtra बँकिंग छळवणूक : एक मृत्यूचा सापळा....

बँकिंग छळवणूक : एक मृत्यूचा सापळा....





बँकिंग छळवणूक : एक मृत्यूचा सापळा....

(वसुलीच्या परवानगी बरोबर द्यावेत बंदुकीचे परवाने)

जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज व प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प.शिरीष महाराज मोरे यांनी अवघ्या तिसाव्या वर्षी आत्महत्या करून आपले जीवनयात्रा अर्ध्यावरती संपविल्याचे समजले व समाज सुन्न झाला.वारकरी संप्रदयाबरोबर समाजात एक दुःखाचे सावट पसरले.ती आत्महत्या कर्जाला कंटाळून केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.गहाणवटीची व कर्जाची सर्व कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून समाजाला कर्जमुक्त करणारे पाहिले संत व वारकरी संप्रदायाचा कळस बनलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारसांना कर्जासाठी आत्महत्या करावी लागणे ही एक फार मोठी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल.

 याचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होईल. महाराजांनी या प्रसंगी काय करायला हवे होते आपले तत्वज्ञान सांगून आपली विद्वत्ता पाजळणारे तत्ववेत्ते निर्माण होतील. परंतू जे या मानसिकतेतून जात असतात त्यांनाच त्यांची वेदना माहित असते.फक्त शिरीष महाराजच नाहीत आपल्या देशात असंख्य लोक कर्जच्या ओझ्याखाली याच मानसिकतेत जीवन जगत आहेत.कर्जच्या ओझ्याखाली दिवसात कितीतरी आत्महत्या होत असतात याची गणना सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात करणं शक्य नाही. याला काही प्रमाणात अव्यवस्थित असलेली बँकिंग प्रणाली कारणीभूत असल्याचे मानावे लागेल.

 शासकीय बँका गरीब,गरजू लोकांना सहज कर्ज देत नाहीत,सहकारी किंवा खाजगी बँका,पतसंस्था यांच्या अटी व शर्ती सामान्य व्यक्ती पूर्ण करताना दमछाक होते,शेवटी गरजेपोटी जास्त व्याजदर असणाऱ्या व सहज कर्ज उपलब्ध करणाऱ्या खाजगी फायनान्स कंपनी,मायक्रो फायनान्स,बचतगट,भिशी,उसन वार,खाजगी सावकार इ. यांचेकडून कर्ज घेऊन आपली गरज भगवावी लागते. 

 सामान्य व्यक्ती कर्ज फेडन्याची क्षमता विचारात घेऊन कर्ज घेतो परंतू अचानक आलेल्या संकटामुळे अथवा काही अंदाज चुकल्या कारणाने कर्ज फेडण्यास असमर्थ झालेली व्यक्ती कर्जाचा डोंगर डोक्यावरती घेऊन बसतो व कर्जबाजारी म्हणून जीवघेणे जीवन जगण्यास सुरवात करतो.

आपल्या देशात आत्ता गरज नसताना लोकांना 'कर्जबाजरी' करण्याचा विडा काही फायनान्स कंपन्यानी उचललेला आहे.त्या सापळ्यात देशातील सर्वाधिक नागरिक संपलेले आहेत. एक नामवंत फायनान्स कंपनी झिरो टक्के व्याजदराच्या गोंडस नावाखाली लोकांना विविध वस्तू खरेदी करून घेण्यासाठी सेवा पुरवते. पुढे काही महिन्यात त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना कर्ज घेण्यासाठी वारंवार फोन करून प्रवृत्त करते. कर्ज सहज व त्रासाविना उपलब्ध होत असल्यामुळे गरज नसताना व कोणतेही पूर्व नियोजन नसताना ती व्यक्ती त्या कर्जाच्या मोहात पडून कर्ज स्वीकारते. आलेले पैसे कोणतेही नियोजन नसल्या कारणाने अनाठायी खर्च होतात व त्यानंतर त्याचे डोळे उघडतात तेंव्हा वस्तूचा हप्ता व कर्जाचे हप्ते एकत्रित सुरू असतात. त्यापुढे त्याची खऱ्या अर्थाने दुर्दशा व्हायला सुरुवात होते. त्यावेळी फायनान्सरुपी अजगराने पूर्ण विळखा घातलेला असतो. सुखात चाललेले जीवन कधी कर्जात बुडाले हे त्याला समजत सुद्धा नाही आणि मग सुरू होतो हप्ते भरण्यासाठी नवीन कर्ज काढण्याचा प्रयोग. त्यावेळी समोर असते क्रेडिट कार्ड, बचत गट, मायक्रो फायनान्स, ॲपलोन, उसनवारी, वैयक्तिक कर्ज, सावकारी कर्ज, व हे कर्ज फिटत नसल्याने घरातील सोने,चांदी दागिने गहाण व शेवटी शेती विकण्यापर्यंत जाऊन सहन न झाल्यास शेवटी आत्महत्या हा पर्याय उरतो. 



या फायनान्स कंपनीने 0% व्याज दाराच्या गोंडस नावाखाली मिळवलेल्या ग्राहकाला कर्जबाजारी करून अर्ध्या हिंदुस्थानचे सीबील खराब करून टाकले आहे.जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून गणाला गेलेल्या व देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मिरविणाऱ्या पक्षाच्या सभासदांपेक्षा जास्त त्या कंपनीचे कर्जदार आहेत. ही कंपनी दुसरी 'ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी' बनली असून व्यापाराच्या नावाखाली येऊन बहुसंख्य नागरिकांच्या मानसिकतेवरती अप्रत्यक्ष राज्य करीत आहे.व त्यांचे वसुली अधिकारी जनरल डायर च्या मानसिकतेत लोकांना सतावत आहेत.

याशिवाय बँका,पतसंस्था,फायनान्स कंपनी,ऑनलाइन फायनान्स,मायक्रो फायनान्स,कंपनी चे बचत गट आपल्या (एन. पी.ए.) थकीत कर्जांना खाजगी वसुली करणाऱ्या कंपनीकडे वर्ग करतात. मग सुरू होतो जीवघेणा खेळ. या खाजगी रिकव्हरी कंपन्या वसुलीसाठी कोणत्याही थराला जातात. वैधानिक मार्गाचा वापर न करता आपल्या महिला प्रतिनिधी मार्फत दिवसभर फोन करून मानसिक कुचंबणा करतात. एवढं करून कर्ज फेडण्यास असमर्थ व्यक्तीस वाईट भाषा, शिव्या, अरेरावी, गुंडगिरीची भाषा. याबरोबर कर्जदारांना त्यांच्या आई, बहीण, मुलगी यांना कोठ्यावरती बसवून आमचे हप्ते भरा म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते. कर्जदारांना अस्लाघ्य, शब्दाचा वापर करतात. त्यांची मानसिक व बौद्धिक कुचंबणा करतात. एवढ्यावर न थांबता त्यांच्या मोबाईल फोनमधील त्यांचे मित्र,मैत्रीण,सहकारी,नातेवाईक याना विविध मार्गाने फोन करून त्यांच्या कर्जविषयी माहिती देऊन तुम्ही कर्ज फेडा म्हणण्यापर्यंत भाषा वापरतात. त्यांची व्यक्तिगत,सामाजिक,कौटुंबिक जीवनातून उध्वस्त करण्यापर्यंत मजल जाते.आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला भावनिक हृदयाचा व्यक्ती हा त्रास सहन करू शकत नाही.अचानक आलेल्या कौटुंबिक समस्येमुळे कर्ज फेडण्यासाठी असमर्थ असणारा संवेदनशील मनाचा व्यक्ती हा आघात सहन न झाल्यामुळे बदनामीला घाबरून तो व्यक्ती आत्महत्तेसारख्या वाईट विचारपर्यंत घेऊन जाण्यास भाग पाडतो.

याप्रकारे वसुलीच्या निमित्ताने कर्जदाराला त्याच्या जिवनातून उठविण्याचा अघोरी डाव सध्या देशात राजरोसपणे सुरू आहे. हि अनिर्बंध असलेली वसुली पद्धत नागरिकांच्या मृत्यूचे सापळेच बनले आहेत.याकडे जनतेचे सेवक म्हणवीवाणारे लोकप्रतिनिधी,जबाबदार विरोधी पक्ष,सुशासनाचा दावा करणारे प्रशासन यांचे कोणाचेही या जीवघेण्या समस्येकडे लक्ष नाही.ह.भ.प.शिरीष महाराजांचे सामाजिक स्थान लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांचे कर्ज फेडून त्यांच्या परिवाराची कर्जातून मुक्तता केली परंतू सर्वसामान्य लोकांच्या परिवाराला आत्महत्तेनंतरही कोणी एकनाथ भेटणार नाही..

हे पाहून अस वाटते की विश्वची माझे घर म्हणून,आईची सावली देणारी माऊली संत ज्ञानेश्वर महाराज व जगाला जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र असणाऱ्या जगाला दिशादर्शक असणाऱ्या भारत देशात गरीब कर्जदार लोकांना जीवन जगण्याचा अधिकार नाही.आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा मनाला गेल्यामुळे मनात असून ते करू शकत नाहीत.यासाठी शासनाने या महिन्यात मार्चएन्ड च्या नावाखाली 'वसुलीचा जागतिक महोत्सव' सुरु असून याचा विचार करता वसुली अधिकाऱ्यांना वसुलीच्या परवानगी बरोबर बंदुकीचे परवाने द्यावेत किंवा त्यांच्या सोबत गुंड न पाठवता शार्पशूटर ची नेमणूक करून कर्जफेडीस असमर्थ कर्जदारांना गोळ्या घालण्याचे आदेश द्यावेत. म्हणजे कायदेशीररित्या व संवैधानिक मार्गाने कर्जदारला मोक्ष प्राप्त होऊन,त्याचे पुण्य देशातील महान आशा बँकिंग प्रणालीला प्राप्त होईल. त्यानंतर राज्यकर्त्याने व प्रशासनाने जिवंत राहिलेल्या नागरिकांवरती 'रामराज्य' करावे...

                          
                           लेखक-दिगंबर साळुंखे
                  वाटंबरे ता.सांगोला जि. सोलापूर 
                             मो-9049106853

हेही पहा....
https://youtu.be/Q8zBKUjrlw0?si=RFgSAEsnNHm31ZCm

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰