yuva MAharashtra सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील - मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील - मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी



 

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : सांगली हा चांगला जिल्हा असून, येथील लोक स्वभावाने चांगले व प्रेमळ आहेत. आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात सांगलीने अनेक चांगले अनुभव दिले असून, सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील, असे भावनिक उद्‌गार मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्यक्त केले.


जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने डॉ. राजा दयानिधी यांची व्यवस्थापकीय संचालक, सिडको येथे बदली झाली असून, महसूल प्रशासनाच्या वतीने आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख-पाटील, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, डॉ. दयानिधी यांच्या मातोश्रींसह सुविद्य पत्नी डॉ. शैलजा दयानिधी, कन्या आदि उपस्थित होते.



सांगलीमध्ये काम करायची संधी मिळणे हे आपले भाग्य असून, महसूल विभागासह सर्वच विभाग, तसेच अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तिंनी आपल्याला या कालावधीत सहकार्य केल्याबद्दल डॉ. दयानिधी यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. तसेच, सांगलीतील कार्यकालात केलेल्या सर्व चांगल्या कामांचे श्रेय टीम वर्कला देऊन सांगलीच्या प्रशासनातील टीम प्रशिक्षित असल्याबद्दल गुणोद्‌गार काढले.


मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, पदावर असलेल्या व्यक्तिबरोबरच खुर्चीला आदर असतो. कारण ती प्रशासनाचा चेहरा आहे. त्यामुळे आपण हे पद माणुसकीने सांभाळायला हवे, त्याचबरोबर कामाच्या धबडग्यात आपले कुटुंबाला वेळ द्या व आरोग्य जपा हा मूलमंत्रही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. तसेच, आपले कुटुंब, वैयक्तिक स्टाफ, वाहनचालक, अंगरक्षक, स्वच्छता कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि अगदी चहा देणारे व्यक्ति यांचाही नामोल्लेख करून त्यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख-पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगतात डॉ. दयानिधी यांच्याबद्दलच्या अनुभवांना उजाळा देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी मानले. तहसीलदार अपर्णा कापसे यांनी सूत्रसंचालन केले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰