सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली मार्फत 'विधी स्वयंसेवकांची - अधिकार मित्र" (P.L.V.) निवड केली जाणार आहे. त्याकरिता वय वर्षे 18 ते 65 या वयोगटातील सांगली जिल्ह्यातील रहिवाशांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली (जिल्हा न्यायालय) अथवा तालुका विधी सेवा समिती, (तालुका न्यायालय) येथे सादर करावेत, त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
विधी स्वयंसेवक म्हणून निवड होण्यासाठी, अर्जदार हा सांगली जिल्ह्यातील रहिवाशी असावा, कमीत कमी दहावी (S.S.C.) पास असावा, एक ते दोन वर्षे सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत काम करण्याची इच्छा असावी, आणि स्वतःचा मोबाईल / स्मार्टफोन असावा. विधी स्वयंसेवकाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने वेळोवेळी निश्चित केलेल्या मानधनाव्यतिरिक्त कोणतेही वेतन अथवा मोबदला मिळणार नाही. अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्जासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली (जिल्हा न्यायालय) अथवा तालुका विधी सेवा समिती, (तालुका न्यायालय) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.