सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 29 बालके हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना झाली असून, त्यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील 29 बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ठाणे येथे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत. ही बालके अत्यंत सुरक्षित हातात आहेत. शस्त्रक्रियेवरून परत आल्यानंतर या बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेला दिसेल. सर्व मुलांना सुदृढ आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून 0 ते 18 वर्षे वयोगटातील ह्रदयरोग संशयित बालकांकरिता 13 मार्च रोजी मोफत 2 डी इको शिबिर घेण्यात आले होते. शिबिरांतर्गत ह्रदय शस्ञक्रियेकरिता संदर्भित करण्यात आलेल्या व यापूर्वी प्रलंबित असलेल्या 29 बालकांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये ह्रदय शस्ञक्रियेकरिता आज मोफत प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेसह सिव्हील हॉस्पीटल सांगली येथून पाठविण्यात आले.
संपूर्ण राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंञी प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेतून राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगरविकास यांच्या समन्वयाने मोहीम राज्यस्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार हा उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे.
बालक व पालक असे एकूण 47 प्रवासी यांना मोफत प्रवास, निवास, भोजन खर्चासहित शस्ञक्रियेकरिता ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रती शस्ञक्रिया 4 लक्ष प्रमाणे अंदाजित खर्च हा रु. 1 कोटी 20 लक्ष रक्कमेच्या शस्ञक्रिया या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य योजना, खाजगी रक्कम दाते, धर्मादाय संस्था इत्यादी मधून अनुदान उपलब्ध करुन पूर्णपणे मोफत होणार आहेत.
बालकांच्या प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांच्यामार्फत उच्च दर्जाची बससेवा मोफत उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस हे कार्यक्रमाचे नियोजन करित आहेत.