सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी सफाईगार स्वरूपाचे एक काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. हे काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रांसह दि. 5 एप्रिल 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस यांच्याकडील एक सफाईगार काम असून कामाचा कालावधी 11 महिने (फेब्रुवारी 2026 पर्यंत) आहे तर कामगार आयुक्त यांच्याकडून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार मानधन प्रतिदिन 579 रूपये आहे.
बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच, सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरीक्षण केलेले असावे. सन 2023-24 चे लेखापरीक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/ लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्यक्षेत्र पलूस / पलूस तालुका आहे, तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी, असे आवाहनही श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.