सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : समता पंधरवडा दि. 1 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील, डिप्लोमा तृतीय वर्षातील, सीईटी देणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे बार्टीचे महासंचालक यांनी निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी समता पंधरवडा कालावधी विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयात त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी (३ वर्ष / ५ वर्षे विधी) व बी. एड्. इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग तसेच एसईबीसी (मराठा) या प्रवर्गातील आरक्षण अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम व नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः 3 ते 5 महिन्यांचा कालावधी समिती निर्णयाकरिता असतो. वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यास्तव अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.