सांगली, दि. 25 (जि.मा. का.) : सांगली जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालये दि. 29 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्ष अखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सुरू ठेवण्यात येत असून सर्व प्रकारचे दस्त नोंदणीचे कामकाज चालू ठेवण्यात येत आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे- जिरंगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सन 2024- 2025 हे आर्थिक वर्ष संपत येत असल्याने वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. महत्त्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. यास्तव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आर्थिक वर्ष 2024-2025 या वर्षातील इस्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने 29 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्ष अखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.