कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या दुसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : वनविभागापुढे वनसंवर्धन व वनसंरक्षण, मानव वन्यजीव संघर्ष, वनवणवे, अतिक्रमण यासारखी आव्हाने आहेत. या वनविभागापुढील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून वनसंपदेचे रक्षण करा, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिश्वास यांनी केले.
कुंडल वनप्रबोधिनी येथे नवनियुक्त वनरक्षक पायाभूत पाठ्यक्रम सत्र क्र. 2 च्या दिक्षांत समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) पुणे तथा कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन. आर. प्रवीण, कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक (प्रा.) आर. एम. रामानुजम, सातारा उपवनसंरक्षक (प्रा.) आदिती भारद्वाज, सांगली उपवनसंरक्षक (प्रा.) नीता कट्टे, कुंडल वन प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे, चेतना, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई चे संचालक डॉ. महेश कोलतामे, सामाजिक वनीकरण, सागंली चे विभागीय वनअधिकारी प्रशांत वरुडे, सहयोगी प्राध्यापक रमेश लिधडे, प्रबोधिनीतील सहायक वनसंरक्षक व सत्र संचालक कल्याणी यादव, बाळकृष्ण हसबनीस, दत्तात्रय शेटे, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, सुखदेव खोत, अर्जुन सोनवणे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिश्वास नवनियुक्त वनरक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, सेवेच्या सुरुवातीलाच देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण घेवून तुम्ही बाहेर पडत आहात. गेल्या 6 महिन्यांमध्ये प्रशिक्षणादरम्यान कवायत, खेळ यांच्या माध्यमातून उत्तम फिटनेस राखला असून असाच फिटनेस पुढे आयुष्यभर राखावा. या ठिकाणी मिळालेल्या प्रशिक्षणातून शारीरिक व मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम झाला आहात. तुम्ही वनविभागाचा चेहरा आहात. जनतेशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून, वनसंरक्षण कामी त्यांचे सहकार्य घेवून वनांचे, वन्यजीवांचे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करा, त्यामध्ये वृद्धी करा. वनसेवेमध्ये महिलाही अतिशय उत्तम भूमिका बजावू शकतात, असे सांगून त्यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे यांनी अहवाल वाचन करताना प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला. सत्र संचालक कल्याणी यादव यांनी निकाल वाचन केले. राधा विठ्ठल साखरे या गुणानुक्रमे सर्वप्रथम येवून सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना 'सर्वोत्कृष्ट अष्टपैलू वनरक्षक' हा सन्मानही प्राप्त झाला. कल्पना डोळे यांना 3 विषयांत, सुप्रिया काळे यांना 2 विषयांत तर राधा विठ्ठल साखरे व प्रिया साबळकर यांना प्रत्येकी एका विषयात रजत पदके प्राप्त झाली. या प्रशिक्षण सत्रामध्ये नागपूर, धुळे व संभाजीनगर या वन वृत्तांतील 45 महिला व 86 पुरुष अशा 131 प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षणार्थींच्या दिक्षांत संचलनासाठी शारीरिक शिक्षण निदेशक संजय घेरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील अधिकारी व कर्मचारी यांनीही परेडसाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बाळकृष्ण हसबनीस यांनी तर आभार कल्याणी यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.