सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी “जीवनगाणे गातच जावे”
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : कारागृहातील कैदी गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेत पडावेत, त्यांच्यामध्ये चांगली सुधारणा व्हावी, त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. कैद्यांनी “जीवन गाणे गातच जावे…” हा सुविचार आत्मसात करून एक चांगले व्यक्तिमत्त्व बनून जीवन जगावे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा कारागृह अधीक्षक विजय कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या वतीने व मा. सुहास वारके, अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विशेष सहकार्याने आणि मा. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा कारागृह येथे आयोजित “जीवन गाणे गातच जावे” या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तुरूंग अधिकारी सचिन पाटील यांच्यासह कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी, कलाकार व कारागृहातील कैदी उपस्थित होते.
कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यामध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी राज्यातील मुख्यालय असणाऱ्या सर्व कारागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणारा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होता.
कारागृह अधीक्षक विजय कांबळे म्हणाले, जीवन हे देवाने माणसाला दिलेली देणगी असून ते पुन्हा पुन्हा येत नाही. कैद्यांनी आपण देशाचे नागरिक आहोत व देशाचे भवितव्य आहोत हा विचार मनात रूजवून गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून आपल्या कुटुंबासमवेत चांगले जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक व तबलावादक राम चौगुले, हँडसोनिक रिदम मशील वादक अतुल ठाणेदार, सिंथेसायझर वादक संग्राम कांबळे, निवेदक फय्याज नरवाडे, गायक कुणाल शर्मा, प्रशांत कोपार्डे, गायिका वीणा चौगुले तसेच संदीप कांबळे या कलाकारांनी देशभक्तीपर गीत, भावगीत, लावणी, गझल आदि संस्कृती व प्रबोधनात्मक गीत व संगीताच्या माध्यमातून कैद्यांचे प्रबोधन व मनोरंजन करून त्यांच्यामध्ये चांगले जीवन जगण्याबाबतचा उत्साह निर्माण केला. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे कैद्यांच्या देहबोलीतून दिसून येत होते. काही कैद्यांनीही देशभक्तीपर गीत सादर केले. यावरून शासनाच्या या उपक्रमाचा हेतू साध्य झाल्याचे जाणवले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राज्यगीत सादर करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र कारागृह नियमावली १९७९ मधील तरतुदी तसेच सुरक्षाविषयक खबरदारी घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला.