सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : सामाजिक समता सप्ताह निमित्त आज चंपाबेन बालचंद शहा महिला महाविद्यालय, सांगली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबाबत माहिती देण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व चंपाबेन बालचंद शहा महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, महानगरपालिका समुपदेशक नंदा कांबळे, प्राचार्य एस.एन.खिलारे, सांस्कृतिक, मानसशास्त्र प्राध्यापक दिलीप बीराजे आदि उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबाबत माहिती देऊन संविधानाची प्रत घरोघरी असली पाहिजे असे ते म्हणाले.
महानगरपालिका समुपदेशक नंदा कांबळे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यातून महिलांना केवळ आत्मसन्मानच दिला नाही तर त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्वातंत्र्य ही प्राप्त करून दिले. स्त्री शिक्षण व महिला संरक्षणासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली. महिलांना सामाजिक हक्काची व समानतेच्या मूलभूत मूल्यांची जाणीव करून दिली.
प्राचार्य एस.एन.खिलारे व प्राध्यापक दिलीप बीराजे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य एस.एन.खिलारे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनास मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास समाज कल्याण निरीक्षक राहुल जाधव, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कल्याणी देठणकर, समाज कल्याण निरीक्षक अमृता लिमये, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
संविधान जागर विषयी व्याख्यान
समाज कल्याण कार्यालय सांगली येथे संविधान जागर या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, प्रज्ञावंत कांबळे, सतीश कोलप आदि उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा पुरेपुर वापर महिलांनी, पुरूषांनी त्यांच्या हक्कासाठी करावा, असे आवाहन केले.
प्रमुख वक्ते प्रज्ञावंत कांबळे यांनी सामुहिक प्रास्ताविकेचे वाचन केले. संविधान जागर याविषयी व्याख्यान देताना त्यांनी प्रस्ताविकेतील मुलभुत तत्वे व त्यातील बारकावे तसेच संविधानाने दिलेले मुलभुत हक्क, स्वातंत्र्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालय व शासकिय वसतिगृहाचे कर्मचारी, निवासी शाळेचे कर्मचारी, तालुका समन्वयक, बार्टीचे समतादूत, नागरिक उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰