सांगली, दि. १५ (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भटक्या व विमुक्त जातीच्या नागरिकाना दाखल्यांचे प्रातिनिधिक वितरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः गृहभेटी देऊन केले. जिल्हाधिकारी यांच्या या उपक्रमामुळे वडार कॉलनीतील नागरिक भारावून गेले.
वडार कॉलनीत वडार माकडवाले व धनगर समाजाच्या दाखले वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः काही लाभार्थींच्या घरी जाऊन दाखले प्रातिनिधिक वितरण केले. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. साक्षात जिल्हाधिकारी महोदय आपल्या घरी आल्याचे पाहून संबंधित लाभार्थींचा आनंद अवर्णनीय असाच होता. पूर्वनियोजित कार्यक्रमातील दाखले वाटप करून न थांबता जिल्ह्याचे प्रशासनप्रमुख म्हणून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत या नागरिकांना विश्वास देऊन सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
अपर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी दाखले वाटपाच्या अनुषंगाने अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 18 शिबिरे घेतली होती. लोकवस्तीच्या ठिकाणीच ही शिबिरे घेऊन त्या ठिकाणी महा-ई-सेवा चालक, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आदींच्या सेवा व सर्व तांत्रिक सहाय्य जागेवर उपलब्ध करून देण्यात आले. शिबिरामध्ये प्राप्त अर्जांमधून आतापर्यंत 1918 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी शहरी भाग वगळता ग्रामीणच्या 13 गावांमधून 452 दाखल्यांचे वाटप नियोजित आहे. आज काही दाखल्यांचे वितरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, नायब तहसीलदार मनोहर पाटील व अप्पर तहसील कार्यालयाचे सर्व मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी नियोजन केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰