सांगली, दि. 5 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील रमाई घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून घेऊन जास्तीत जास्त लोकांना घरकुले मंजूर करण्यात यावी. प्रलंबित असणाऱ्या घरकुलांची कामे तात्काळ पूर्ण करावी, अशा सूचना अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) धर्मपाल मेश्राम यांनी दिल्या.
ग्रामपंचायत बहे (ता. वाळवा) येथे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या असणाऱ्या 16 टक्के अनुसूचित जाती यांच्या एकूण उद्दिष्टापैकी मंजुरी मिळालेल्या रमाई घरकुलाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विस्तार अधिकारी अविनाश दाइंगडे, प्रदीप मोरे, विकास उरुणकर, ग्रामविकास अधिकारी सुरेखा माने आदि उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम म्हणाले, जिल्ह्यात ६९५ ग्रामपंचायती आहेत. सन २०२४-२५ मध्ये रमाई घरकुल आवास योजनेचे उद्दिष्ट ६५० होते. पैकी ५६० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. हे उद्दिष्ट लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांनी गावठाण व गावठाणबाहेरील शासकीय जमिनी अनुसूचित जातीतील नागरिकांना देण्याबाबत कार्यवाही करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी अतिक्रमण नियमानुकूल करणे व शासकीय जागेबाबतची माहिती घेऊन प्रलंबित घरकुल मंजूर करण्याचे निर्देश दिले. घरकुले मंजूर करताना काही अडचणी येत असतील तर त्या संदर्भात अनुसूचित जाती जमाती आयोगाशी पत्रव्यवहार करावा. घरकुलाच्या रकमेत पन्नास हजार रुपये वाढ झाली असल्याचे सांगून त्यांनी मागासवर्गीय लोकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
रमाई घरकुल योजना लाभार्थीच्या घरकुलास भेट
आढावा बैठकीपूर्वी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी बहे येथील रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी प्रकाश कांबळे यांच्या घरी भेट देऊन घरकुलाबाबत सविस्तर माहिती घेतली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰