सांगली, दि. २५ (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत मिरज येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील सुसंवाद शिबिरामार्फत जास्तीत जास्त खातेदार यांनी शासनाकडील प्रलंबित भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १ व तहसीलदार मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय मिरज येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १ तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता लष्करे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. खोत आणि त्यांचे सहकारी आदि उपस्थित होते.
मिरज तालुक्यातील सन २०१५ पासून म्हैसाळ प्रकल्प कॅनॉल मध्ये भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला रक्कम अद्याप न घेतलेल्या बेळंकी येथील ८१ खातेदार तसेच सांबरवाडी येथील ५८ खातेदार यांना भूसंपादन सुसंवाद शिबिरात बोलावण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सन २०१५ पासून भूसंपादित जमिनीची मोबदला रक्कम संबंधित खातेदार यांनी न स्वीकारण्याचे कारण, त्यावर ही रक्कम सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून कशाप्रकारे संबंधित खातेदार यांना देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अशी शिबीरे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात घेण्यात येणार असून संबंधित खातेदारांनी कागदपत्राची पूर्तता करून भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारावी, असे ते म्हणाले.
जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे यांनी या शिबिराबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १ तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली.
शुभारंभाच्या दिवशी बेळंकी येथील तीन प्रकरणी तसेच सांबरवाडी येथील दोन प्रकरणात संबंधित खातेदार यांनी आवश्यक स्वयंघोषणापत्र देऊन भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारत असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) स्नेहल कनिचे यांनी केले. आभार मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी मानले. या कार्यक्रमास संबंधित गावचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संबंधित खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰