सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : रस्ता सुरक्षा अभियान, वर्षभर रहावे. विद्यार्थ्यी-नागरीकांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण व्हावा. वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती ही केवळ अभियानापूर्ती न राहता यासाठी सामाजिक चळवळ उभी रहावी. सर्वांनी रहदारीचे नियम अंगी बाळगून सतर्कता आणि दक्षता निर्माण करावी, यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करता येईल, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली, जिल्हा पोलीस दल व आरएसपी विभाग तसेच शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "सडक सुरक्षा जीवन रक्षा" या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने शालेय स्तरावरील आर एस पी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने, आरटीओ व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून विविध स्पर्धा, जिल्ह्याभर आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ जिल्हा परिषद सांगली येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, आरएसपी प्रमुख तथा महासमादेशक अनिल शेजाळे, जिल्ह्यातून आलेले सहभागी सर्व आरएसपी अधिकारी उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे म्हणाले, रहदारीच्या नियमाबाबत पालकांमध्ये जनजागृती करावयाची असल्यास विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावतील. विद्यालयामध्ये होत असणाऱ्या या विषयाअंतर्गत अध्यापनातून समाज परिवर्तन घडवण्यासाठी मदत होईल. हा उपक्रम आर एस पी च्या माध्यमातून होत असल्याने त्यांनी आर एस पी चे कौतुक केले. प्रत्येक शाळेत आर एस पी विषय राबविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी यावेळी, शालेय जीवनात आर एस पी चे महत्व पटवून सांगितले. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवीन अभ्यासक्रमात या विषयाची विशेष नोंद घेतल्याचे विशद केले.
महासमादेशक अनिल शेजाळे यांनी महाराष्ट्रात १ लाख २९ हजार २७५ बाल सैनिक आरएसपी चे धडे घेत असल्याचे सांगून लवकरच आरएसपी विषयास सवलतीचे गुण मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी, पोलीस विभागाने या विषयास अधिकाधिक मदत करावी अशी अपेक्षा, जिल्ह्यातील आरएसपी अधिकारी यांनी केली.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध उपक्रम व स्पर्धा घेऊन रस्ता सुरक्षा अभियान साजरे करण्यात आले. यामध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्या विविध स्पर्धातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना जिल्हा परिषद सांगली येथील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतून २३८ विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सन्मानित केले. प्रोत्साहनासाठी आरएसपी अधिकारी यांनाही विशेष उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास नीता मोरे, सोपान भोसले, पोपट काळे, श्वेता पाटील, आरती धेंडे, विक्रांत लोणारी, शितल कदम, विशाल यादव, आर एस पी अधिकारी व बाल सैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सल्लाउद्दीन अत्तार यांनी केले. आभार राजेंद्र भोसले यांनी मानले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰